चाळीसाव दिलीप घोरपडे । एकीकडे कोरोनामुळे बळीराजा जेरीस आला असतांना काही व्यापारी यातही शेतकर्यांची फसवणूक करतांना दिसून येत असून असाच एक प्रकार येथे उघडकीस आला असून बोगस खताचा मोठा साठा येथे जप्त करण्यात आला आहे. शेतकर्यांची फसवणूक करणार्या या व्यापार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.
चाळीसगाव येथील घाट रोड वरील छाजेड ऑइल मिल जवळ शैलेश छाजेड यांचे महावीर कृषी केंद्र आहे. या कृषी केंद्रांमध्ये विकण्यासाठी घाट रोड वरच जॅक्सन मोटर समोरील भिकन अर्जुन पाटील रमेश अर्जुन पाटील यांच्या मालकीच्या भाड्याने घेतलेल्या गोडाउन मध्ये खाली होण्यासाठी आलेले खत हे १८ १८ नावाने असून त्यात मात्र जीप्सम नावाचे निकृष्ट दर्जाचे खत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या पथकास मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी येऊन छापा टाकून हा माल जप्त केला आहे. यात खत हे फक्त दीडशे ते दोनशे रुपये किमतीचे असून १८ १८ या रासायनिक खताच्या नावाने सदर छाजेड नामक व्यापारी त्याची विक्री करण्यासाठी याचा साठा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रासायनिक खताची किंमत साधारण ९०० ते १००० रुपयांपर्यंत असून या खताच्या व १८ १८ या खताच्या किमतीमध्ये जवळपास ९०० रुपये इतका फरक आहे. यामुळे संबंधीत व्यापारी हा शेतकर्याची फसवणूक करीत असून त्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे दिसून आले आहे.
सध्या परिस्थितीमध्ये वादळ करोना या सर्व संकटामुळे शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने हवालदिल झाला असून तो आर्थिक अडचणीत आहे. त्यामध्ये अशा व्यापार्याने त्यांना असून हलक्या प्रतीचे खत महाग विकून त्याची आर्थिक पिळवणूक करून फसवणूक करण्याचा प्रकार केला आहे. वर्षभर राबराब राबून आपल्या शेतीची मशागत करून पावसाळ्यात पेरणी करणार्या शेतकर्याला आपल्या पिकाला चांगल्या प्रतीचे रासायनिक खत देऊन चांगले उत्पन्न यावे ही अपेक्षा असते. मात्र जिप्सम नावाचे खत म्हणजे निव्वळ राजस्थानमधील माती असून ही माती १८ १८ या नावाने विकण्याचे पाप या व्यापार्याने केले आहे. कृषी विभागाचे विभागीय तंत्र अधिकारी उल्हास ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात त्यांच्यासह अरुण तायडे – जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक जळगाव; सी. डी. साठे- तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव; एम. एस. भालेराव – कृषी अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी विजय साठे, पो कॉ सतिश राजपूत, भूषण पाटील यांचा समावेश होता. याबाबत चाळीसगाव पोलिसात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू आहे.