
जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चरित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. लदळ्या आसाराम पावरा (रा. शेमोखुट ता. झेरल्या जि.खरगोन (मध्यप्रदेश)) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लदळ्या आसाराम पावरा यांचा विवाह जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे राहणाऱ्या फुनाबाई दगडू बारेला हिच्याशी झाला होता. लदळ्या हा पत्नी फुनबाई हिच्यावर चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ व मारहाण करत होता. मार्च २०१८ मध्ये होळीच्या निमित्ताने फुनाबाई ही मालखेडा येथे आई जिलाबाई व वडील दगडू बारेला यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी लदळ्या हा पत्नीला घेण्यासाठी मालखेडा येथे आला होता. रात्री जेवण करून सर्व कुटुंबिय झोपलेले असतांना लदळ्या याने हातात चाकू घेवून पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार करून खून करून पसार झाला होता. या प्रकरणी शेंदुर्णी दुरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून लदळ्या याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयित आरोपीवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयाचे न्या. ए.के. लाहोटी यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात १२ साक्षिदार तपासण्यात आले. यात मयत फुनाबाईचे आई, वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली.
या आरोपी लदळ्या याला दोषी ठरवत कलम ३०२ अन्यये आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ३ महिन्याची सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता निलेश चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी संजय गोसावी यांनी सहकार्य केले.


