जळगाव प्रतिनिधी । एरियाचा दादा असल्याचे सांगून चाकूने धाक दाखवत बांधकाम व्यवसायिकांकडून पैश्यांची लुबाडणूक करणाऱ्या एकाविरोधात जिल्हापेठ आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शंभूदयाल बनवारीलाल सैनी (वय- २७) रा. वाघ नगर मंदीरासमोर हे बांधकाम इमारतीत टाईल्स बसविण्याचे काम करतात. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्यासुमारास कामाच्या निमित्ताने भास्कर मार्केटमधील दुकानावर दुचाकीने आले. दुकानावर असता राहुल सुरेश हटकर रा. हरीविठ्ठल नगर एका अनोळखी मुलासोबत आला. आणि शंभूदयाल सैनी यांच्याकडे राहुल हटकर याने १० हजार रूपयांची मागणी केली व आपण राजस्थानी माणसांकडून हप्ता घेतो असे सांगून धमकी दिली.
याला विरोध केल्याने चाकूचा धाक दाखवत खिश्यातील १ हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर पुन्हा मोबाईलवर फोन करून पाहून घेईन अशी धमकी दिली. यानंतर २० ऑगस्ट २०२० रोजी सैनी यांच्या सोबत काम करणारे बजरंगलाल प्रल्हाद कुमावत (वय-४६) रा. महाबळे, विनोद महावीर सैनी (वय-३८) रा. रामनगर मेहरूण, हे दोघे भास्कर मार्केट येथे कामाच्या निमित्ताने आले असतांना त्यांच्याकडून बळजबरीने ३०० रूपये काढून घेतले.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा
संशयित आरोपी राहुल हटकर याच्याविरोधात शंभूदयाल सैनी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर तालुका पोलीस ठाण्यात महेंद्रकुमार भवानी सैनी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.