गडचिरोलीः वृत्तसंस्था । ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस दलाच्या सी-६० च्या जवानांना आज मोठं यश आलं आहे. आज झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास जवानांना यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.
सी ६०चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सी-६० पथकातील जवानांचा आक्रमक पवित्रा पाहता माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उदध्वस्त केला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आलं होतं.