चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली

 

मुंबई : वृत्तसंस्था । चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी उठवण्यात आली आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

 

अनेक महिन्यांपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमधली दारूबंदी चर्चेचा विषय ठरली होती. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने त्यासंदर्भातला निर्णय घेतला असून दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे जवळपास ३ लाख निवेदने देखील आली होती.

 

६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली आहे. “दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. तरुण वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला होता, तर महिला-लहान मुले या व्यवसायात उतरले होते. परिणामी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली होती. अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

Protected Content