चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना पुन्हा डिवचलं

 

पुणे : वृत्तसंस्था । जे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे… तेच धाडस आता शरद पवार यांनिही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, आरोप असलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आज अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता है।” असं त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

 

 

 

“आता सर्व चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे आणि हत्या की कोणाच्या दबावामुळे आत्महत्या हे सर्व जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार ही मागणी केली होती की धनंजय मुंडेच्या मुद्द्यावरही हाच निर्णय घेतला गेला तरच सरकारची थोडीफार इज्जत वाचू शकते. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पाऊल उचललंच पाहिजे. जनता, भाजपा आणि मीडिया या सर्वांच्या दबावामुळेच हा राजीनामा दिला गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या परंपरेनुसार पूजा चव्हाणला आधीच न्याय द्यायला हवा होता. असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.”

 

 

वनमंत्री संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा या प्रकरणी तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधिमंडळात तोंड उघडू देणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला होता.

Protected Content