चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना डिवचले

 

पुणे : वृत्तसंस्था । ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेतील सत्तेबाबत स्वप्न पडत आहेत. मात्र, त्यांनी ऊर्जा वाया घालवू नये. आम्हीही तुमचे बाप आहोत,’ असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना पुणे महापालिकेतील सत्तेवरून लगावला .

पालकमंत्री झाल्यानंतर पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांनी हाच धागा पकडून पवारांना ऊर्जा वाया न घालविण्याचा सल्ला दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून सर्व पदे भाजपकडे आहेत. आपण सर्वाधिक मोठ्या पक्षाचे सदस्य असून त्याचा अभिमान वाटला पाहिजे; तसेच जबाबदारीनेही वागले पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या. या वेळी पाटील यांना पवारांवर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यकर्ता कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले आहे. भाजपचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ खासदार निवडून आले आहेत. सहयोगी खासदारांची संख्याही वाढली आहे. आपण एका मोठ्या पक्षाचे सदस्य आहेत. महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत ११ ठिकाणी भाजपचे अध्यक्ष निवडून आले आहेत. उर्वरित चारपैकी एका ठिकाणी टॉस झाला आणि ती जागा भाजपला मिळाली नाही. काही तरी जादू करून सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले पाहिजेत, असे मी म्हणत होतो. मात्र, तसे झाले नाही. अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्ने पडत आहेत. परंतु, त्यांनी जादा ऊर्जा वाया घालवू नये, आम्हीदेखील अजित पवार यांचे बाप आहोत,’ अशी टीका पाटील यांनी पवारांवर केली.

Protected Content