मुंबई : वृत्तसंस्था । “चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप 100 च्या आसपास जागा मिळवण्याची शक्यता आहे, तृणमूल काँग्रेसने 185 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
“चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प. बंगालमध्ये आले, मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरुन 84 वर जागा आल्या, हे बोलायला राज्यातील भाजप नेत्यांना जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.” असे तिरकस बाण मिटकरींनी ट्विटरवरुन सोडले.
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.
चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.