चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेची संजय राऊतांकडून खिल्ली

मुंबईः वृत्तसंस्था | दैनिक सामनातील भाषेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाराज असून ते सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या या निर्णयावर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

अग्रलेखातही वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचं असं संपादकीय असू शकत नाही, अशी भूमिका पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘अरे बापरे, मला आता त्यांची भीती वाटतेय. ते पत्र लिहतायेत,’ असं मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.

‘सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सामना वाचत राहिले तर त्यांचा विश्वास बसेल की पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,’ अशी टीका राऊतांनी केली आहे.

‘औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचं आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल,’ असंही राऊतांनी स्पष्ट केला आहे.

‘महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे आणि असायलाच हवी.जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसाच औरंगजेबही नाही,’ असं राऊत म्हणाले आहेत.

Protected Content