चेन्नई । कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्याराणी हिने भारतीय जनता प्रवेश घेतला असून ती तामिळनडच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून लढण्याची शक्यता आहे.
चंदन तस्कर वीरप्पन याला खूप प्रयत्न केल्यानंतर ठार मारण्यात आले होते. त्याने सरकारला अक्षरश: जेरीस आणले होते. आता त्याची मुलगी विद्याराणी हिने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वकिली व्यवसाय करणार्या विद्याराणी यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पक्षात प्रवेश केला.
वीरप्पन आणि मुथ्थुलक्ष्मी यांना दोन मुली आहेत. विद्याराणी ही मोठी तर प्रभा ही धाकटी. विद्याराणी ही २९ वर्षांची आहे. या प्रवेशावर विद्याराणीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मी भेटले होते. तेव्हा त्यांनी भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावर विचार करून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली. त्या तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवार राहतील अशी शक्यता आहे. मात्र तूर्तास याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.
विद्याराणी यांनी २०११ साली मारिया दीपक या ख्रिस्ती प्रियकराशी केलेला विवाह खूप गाजला होता. तिची आई मुथ्थूलक्ष्मी यांनी या विवाहाला प्रखर विरोध केल्याने विद्याराणी यांनी न्यायालयात धाव घेऊन पोलीस संरक्षणात हा विवाह केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता राजकारणातील प्रवेशाने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.