जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात जळगाव परिमंडलातील ४ लाख ३१ हजार ६५२ ग्राहकांनी ८४ कोटी ८८ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला.
महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. महावितरणच्या वीजबिले ऑनलाईन भरण्याच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. जळगाव मंडलात २ लाख ६७ हजार ९४५ ग्राहकांनी ५० कोटी ३६ लाख, धुळे मंडलात १ लाख १२ हजार ८४१ ग्राहकांनी २५ कोटी ४६ लाख तर नंदुरबार मंडलात ५० हजार ८६६ ग्राहकांनी ९ कोटी ६ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे.
बिलात ०.२५ टक्के सूट
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.
तात्काळ मिळते पोच
वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवा
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.