घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीरामपेठेत एका गल्लीत लोखंडी पत्र्याच्या टपरीमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणावर शनिवार, १७ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रीक मोटार, रेग्युलेटर, नळ्या, व रिकामे सिलेंडर तसेच दोन ऑटो रिक्षा असा एकूण ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बळीरामपेठेत गंगूबाई शाळेच्या मागे एका लोखंडी पत्र्याच्या टपरीमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे वापर केला जात असून वाहनांमध्ये भरुन त्याचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गॅस भरण्यासाठीचे इलेक्ट्रीक मोटार, पंप, रेग्युलेटर नळ्या, रिकामे सिलेंडर तसेच दोन ऑटो रिक्षा असा एकूण ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरुन फिरोज खान सलीम खान वय २८ रा, काट्याफाईल, पंडीत शिवराम शिरसाळे वय ५७, रा. शिवाजीनगर, व शेख खालीद शेख शफी वय २४ रा. गणेशपुरी, मेहरुण या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर हे करीत आहेत.

Protected Content