जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी सहकार गटाने राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सोसायटीवर सहा महिन्यांपासून प्रशासक नियुक्त आहे. शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे सहकार विभागाने सोसायटीची निवडणूक घ्यावी, अशी मागणी सहकार गटाने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग.स. ही जिल्हास्तरीय राज्य शासकीय कर्मचारी व इतर १०० टक्के अनुदानित संस्थेचे कर्मचार्यांची सहकारी पतपेढी आहे. ४० हजार सभासद, रुपये १ हजार कोटींचे खेळते भांडवल असलेली संस्था ११२व्या वर्षात पदार्पण करत आहे. जिल्हा उपनिबंधकांचे २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नेमणूक केली आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. सोसायटीच्या संचालक मंडळाचा कालावधी ४ जून २०२० रोजी संपलेला असून, अशा परिस्थितीमध्ये संस्थेची निवडणूक घेणे व निवडून आलेले संचालक मंडळ स्थापित करणे अत्यावश्यक आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग.स. सोसायटी ही जिल्हा पातळीवरील मोठी संस्था असून, राज्य शासकीय व इतर कर्मचार्यांचे आर्थिक व्यवहार विचारात घेता, लोकनियुक्त संचालक मंडळामार्फत कारभार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पहिल्या अथवा दुसर्या टप्प्यामध्ये प्राधान्याने घेण्याचे आदेश करावे, अशी मागणी अध्यक्ष उदय पाटील पाटील यांनी केली आहे. या निवेदनावर त्यांच्यास गटनेते अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, भाईदास पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, रागिणी चव्हाण, विद्यादेवी पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.