फैजपूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेड्यापाड्यातील तसेच डोंगरदऱ्यातील सर्व प्रकारची माहिती मिळण्याचे साधन म्हणजे त्या भागातील स्थानिक पत्रकार आहे. त्यामुळे वर्तमानपत्र तथा संपादकाचे नाक हे ग्रामीण भागातील पत्रकार असून पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले.
सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अथक प्रयत्नातून साकारत असलेले वढोदा प्र. सावदा येथील श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित श्री निष्कलंक धाम निसर्गोपचार केंद्रात पत्रकार दिनाचे औचित्य साधून फैजपूर येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने, फैजपूर विभागाचे प्रांत कैलास कडलक, फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे उपस्थित होते.
श्री. अलोने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शहरी भागात काय घडले याची तात्काळ माहिती मिळते. मात्र ग्रामीण भागातील माहिती जनतेपर्यंत लवकर पोहचू शकत नाही. गल्ली ते दिल्ली पर्यंत ही बातमी पोहचविण्याचे काम खऱ्या अर्थाने ग्रामीण पत्रकार करीत असतो. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा सतत सहवास लाभत असल्याने येथील पत्रकार खुप भाग्यवान आहेत. इथल्या मातीला अध्यात्माची जोड आहे म्हणून इथले वातावरण सुंदर, निर्मळ आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे. ज्याचा त्याचा मान सन्मान त्याला देणे हा इथल्या मातीचा संस्कार आहे. म्हणून निसर्गाच्या कुशीत असणारे सुंदर स्थान श्री निष्कलंक धाम निसर्गोपचार केंद्र हे आपल्या जळगाव जिल्ह्याचे भविष्यातील सामर्थ्य आहे, असे त्यांनी सांगितले.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्याकडून दरवर्षी पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करणे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रांत कैलास कडलग यांनी मनोगतात सांगितले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने वर्षभरातून एकदा सामूहिक पद्धतीने फैजपूर शहरातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन चिंतन-मनन करावे या प्रमुख उद्देशाने पत्रकारांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सर्वांनी एकत्र येण्यासाठी त्यांना बांधून ठेवण्याचे काम मी करीत असतो. त्यांच्या मजबुतीचा, समरसतेचा, एकात्मतेचा, संघटनाचा फायदा आपल्या परिसराला वेगवेगळ्या माध्यमातून व्हावा यासाठी सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम मी करीत असतो असे आयोजक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आशीर्वचन देतांना सांगितले. पत्रकारांच्या हाती लेखणीचे ‘असरकारक शस्त्र’ असल्याने त्यांनी समाजात एकात्मतेचे, समरसतेचे, जागृतीचे कार्य करीत रहावे. पत्रकार हा समाजामध्ये ‘सेतु’ म्हणून असल्याने सकारात्मक समाजाच्या निर्माणासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या त्रिसूत्रीतून येथील पत्रकारांचे कार्य सुरू असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या सुंदर, छोटेखानी कार्यक्रमाला फैजपूर शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत पाटील यांनी केले.