मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींसाठी ३ कोटी ३० लाखांचा निधी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्येकी ३.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 

जिल्हा वार्षिक योजनेतर्गत म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा योजनेमधून अंतिम सुधारित तरतुदीद्वारे जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी तब्बल २७ कोटी २८ लक्ष निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरव्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या इमारतीच्या बांधकामासाठी ३.३० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदरील १५ ग्रामपंचायतींना आता हक्काचे फर्निचरसह सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे. एका ग्रामपंचायतीसाठी २२ लक्ष निधी मंजूर केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच जिल्ह्यातील १२४ ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासाठी ९०% निधी म्हणजे २३ कोटी ५६ लक्ष निधी जिल्हा परिषदेकडे वितरित केला आहे लवकरच १२४ ग्रामपंचायतीच्या इमारती सुसज्ज होणार असून कार्यन्वित होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे अशी अपेक्षा ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत हा कोणत्याही गावाचा प्रशासकीय आत्मा असतो. बर्‍याचशा ग्रामपंचायतीच्या वास्तू या जुन्या झाल्या असून काही तर अगदी मोडकळीस आलेल्या आहेत. नेमकी याच समस्येबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्याने याची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचा पॅटर्न अंमलात आणला आहे. याच कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील तब्बल १२४ गावांना फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय मिळणार आहे. या कामांसाठी तब्बल तब्बल २७ कोटी २८ लक्ष रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून तात्काळ २३ कोटी ५६ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरिक केल्यामुळे ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

असे असेल प्रत्येक नवीन ग्रामपंचायत कार्यालय
ग्रामपंचायत कार्यालयातूनच गावाचा कारभार पाहिला जातो. या पार्श्‍वभूमिवर, नव्याने बांधण्यात येणार्‍या ग्रामपंचायतीत सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. यासोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल. तर याला लागूनच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परिणामी गाव कारभार्‍यांची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे.

तालुका निहाय अश्या आहेत मंजूर ग्रामपंचायत कार्यालय!

१) बोदवड तालुका – भानखेडा, मानमोडी व हिंगोणे.
२) , मुक्ताईनगर तालुका – धामणगाव, काकोडा, इच्छापुर ,निमखेडी व चारठाणा
३) रावेर तालुका – कोचुर बुद्रुक , वाघाडी, धामोडी, उदळी बुद्रुक, आंदलवाडी, रणगाव व रायपुर. या १५ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळणार आहेत.

 

Protected Content