गैर भाजपा सरकारशी मोदी सरकारकडून भेदभाव; सोनिया गांधींचा आरोप

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था ।  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावून त्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकार गैर भाजपशासित राज्यांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे.

 

काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या सहयोगी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्र लिहून आवश्यक साधनसामुग्री मागितली आहे. मात्र, केंद्र सरकार मौन साधून आहे. अनेक राज्यांमध्ये व्हॅक्सिन नाहीत, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. गैर भाजपशासित राज्यांना मदत दिली जाचत नाही, मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

 

दुसऱ्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे आपल्याच देशात हजारो लोक व्हॅक्सीन मिळत नसल्याने मरत आहेत, असं सांगतानाच रेमडेसिवीर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असताना रेमडेसिवीर आणि मेडिकल ऑक्सिजनवर 12 टक्के जीएसटी का वसूल केला जात आहे? ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवरही 20 टक्के जीएसटी का वसूल केली जात आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

कोविड संबंधित सर्व साहित्य जीएसटी मुक्त ठेवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. 25 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात यावी, कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनाही लस देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

लॉकडाऊन आणि आर्थिक निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने प्रत्येकी 6-6 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याची आणि या मजुरांचं पुनर्वसन करण्याची मागणीही केली आहे.

 

Protected Content