अहमदनगर : वृत्तसंस्था । पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अहमदनगर येथे आले होते. यावेळी भाषणात तात्याराव लहानेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “गेल्या सरकारच्या काळात मला अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला,” असे लहाने म्हणाले.
“धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन,” असेही डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
“राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,” अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ – संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. लहाने यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
यावेळी धनंजय मुंडे यांचे बीडपाठोपाठ नगरकरांनी देखील अभूतपूर्व स्वागत केले. अहमदनगरपासून प्रत्येक गावात पक्ष कार्यकर्ते-समर्थकांनी ठिकठिकाणी हारा-फुलांनी उत्साहात स्वागत केले. अगदी काही ठिकाणी तर जेसीबीतून फुले उधळत, वाजत गाजत क्रेनने हार घालून मुंडेंचे स्वागत करण्यात आले.
तर लाखो लोकांना दृष्टिदाते म्हणून जगविख्यात ख्याती असलेले डॉ. तात्याराव लहाने यांचा माझ्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करणे ही खरंतर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी शनी देवाचे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, उदयनराजे गडाख पाटील इत्यादी उपस्थित होते. शनी मंदीर देवस्थानच्या वतीने यावेळी मुंडे आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.