गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

 

नवी दिल्ली । ऑईंल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढविली आहे. अशाचप्रकारे 5 किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती.

घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या टाकीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 5 किलोची छोटी टाकी 18 रुपयांनी महागली आहे. तर 19 किलोच्या मोठ्या टाकीच्या किमतीत 36.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी गॅसच्या किमतीत मोठी वाढ केल्यानं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार आता दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाची विनाअनुदानित गॅसची टाकी 644 रुपयांना मिळणार आहे. मुंबईतही दिल्ली इतक्याच दराने गॅस मिळेल. कोलकाता इथं याच टाकीची किंमत 670.50 रुपये असणार आहे. तर चेन्नईमध्ये ही टाकी 660 रुपयांना मिळेल.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, 15 दिवसांनी पुन्हा तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे.

Protected Content