पाटणा : वृत्तसंस्था । भारताचा केवळ गुलामी मानसिकतेने लिहिण्यात आलेला इतिहासच खरा नसून सर्व सामान्यांच्या माध्यमातून जो इतिहास जपला गेलाय तोही आपला इतिहास असल्याचं पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बहाराइचमध्ये श्रावस्ती येथील महान योद्धा महाराजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन केलं. ४.२० मीटर उंचीच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बसंत पंचमीच्या मुहूर्तावर केलं. यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह चित्तोरमध्ये उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या पराक्रमाने आपल्या मातृभूमीचा सन्मान वाढवणाऱ्या राष्ट्रीय नायकांपैकी महाराजा सुहेलदेव असल्याचं सांगितलं. ऋषि मुनींनी ज्या भूमिमध्ये तप आणि यज्ञ केली त्या बहराइचच्या पवित्र भूमीला मी वंदन करतो असंही मोदी म्हणाले.
“आज महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने एक मेडिकल कॉलेज, स्मारक आणि एक पर्यटन भवन निर्माण करण्याचं काम सुरु होतं आहे. ज्यांनी आपल्या देशाला गुलाम बनवलं त्यांच्या नजरेतून गुलामीच्या मानसिकतेमधून लिहिण्यात आलेला इतिहासच भारताचा इतिहास नाहीय. अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारातातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे,” असं पंतप्रधानांनी म्हटलं. नवीन आरोग्य व्यवस्था उपलब्ध झाल्याने बहराइच जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे मोदींनी म्हटलं. बहराइचसोबतच श्रावस्ती, बलमरामपूर, सिद्धार्थनगर यासारख्या जिल्ह्यांबरोबरच नेपाळमधून उपचारासाठी येणाऱ्यांनाही या नव्या सेवांचा फायदा होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला .
पंतप्रधानांनी भारताच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावणाऱ्यांना योग्य मान सन्मान दिला गेला नाही हे दुर्देवी असल्याचं मत व्यक्त केलं. इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासात बदल करुन अशा व्यक्तीसोबत अन्याय केला. मात्र आजचा भारत हा इतिहास बदलत आहे, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी देशात इतिहास, अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कृतिक महत्व असणाऱ्या स्मारकांची उभारणी केली जात असल्याचं सांगितलं. या विकासाकामांचा सपाटा लावण्यामागे पर्यटनाला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.