जळगाव प्रतिनिधी । खोटे बोलण्यालाही काही मर्यादा असतात, असे सांगत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच्या सभेत केलेल्या आरोपांना सणसणीत उत्तर दिले. यासोबत त्यांनी पालकमंत्र्यांना आघाडीधर्म पालन करण्याचे आवाहनदेखील केले.
धरणगाव येथील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी करत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. यात प्रामुख्याने आप्पांनी कामांची प्रशासकीय मंजुरी न घेता बहिणाबाई स्मारक व बालकवी ठोंबरे स्मारकाचे काम अर्धवट केल्याची टीका केली होती. तर धरणगावातील रस्त्याचे डांबर लवकरच निघून गेल्याचा टोलादेखील मारला होता. या पार्श्वभूमिवर, आज गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ना. गुलाबराव पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
गुलाबराव देवकर म्हणाले की, खोटे बोलण्यालाही काही मर्यादा असतात. मात्र ना. पाटील यांनी या सर्व मर्यादांचा भंग केला आहे. वास्तविक पाहता राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने ते मंत्री बनण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा आशीर्वादही त्यांना मिळाला असून याची जाणीव त्यांनी ठेवण्याची गरज आहे. तथापि, महाआघाडीच्या धर्माचे पालन न करता ते नाहक टिका करत आहेत. बहिणाबाई आणि बालकवी यांच्या स्मारकाची कामे आपल्या कालखंडातच मार्गी लागली असून यासाठीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आपण धरणावचा उड्डाण पुल उभारला असून म्हसावद येथील पुलाचे काम सुरू केले. मात्र ुलाबराव पाटील याचे उर्वरित काम पाच वर्षात पूर्ण करू शकले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुलाबराव पाटील यांनी केवळ बाता न मारता जनहिताची कामे करावी असा टोलादेखील त्यांनी मारला.
विधानसभा निवडणुकीच्या काळात गुलाबराव पाटील यांनी प्रचारात ये अंदर की बात हे अप्पा हमारे साथ है! असे सभांमधून म्हटले होते. आता मात्र ते नाहक टीका करत असल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी याप्रसंगी केला.
पहा गुलाबराव देवकर नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2621742641430832