मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की बेलसवाडी रोडवर अंतरखेडा येथे गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारा ट्रक नागरिकांनी पकडला आहे. घटनेत वाहन सोडून चालक पसार झाला आहे. निर्दयीपणे कोंबून गुरांची वाहतूक होत असल्याने यात एका गायीसह दोन गोर्ह्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणार्या ट्रक अंतरखेडा येथून जात असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यानुसार नागरिकांनी यु.पी. ५१ ए.टी.१२७९ क्रमाकांचा ट्रक अडविला. यादरम्यान चालक वाहन सोडून पसार झाला. नागरिकांनी वाहनात पाहणी केली असता, ४९ हजारांचे सात वासरु, १ लाख २० हजार रुपयांचे १२ गोर्हे मिळून आले. यात निर्दयीपणे कोंबल्याने गुदमरुन वाहनात एका गायीसह २ गोर्हयाचा मृत्यू झाल्याचे यावेळी समोर आले. गुरांची सुटका करुन गुरे गोशाळेत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्की येथील पोलीस पाटील दिलीप गयाराम पाटील वय ४२ यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात यु.पी. ५१ ए.टी.१२७९ या क्रमांकावरील अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक परवनी तडवी हे करीत आहेत.