नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नागरोटा चकमकीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी पाकिस्तान आणि गुपकार बैठकीत सामील पक्षांवर निशाणा साधला. पाकिस्तान कुरापती सुरूच ठेवणार व गुपकार बैठकीत सामील झालेल्या पक्षांनी सद्सदविवेकबुद्धी गमावली असल्याचंही सिंह म्हणाले.
“मी पोलीस आणि सुरक्षा दलांचे आभार मानतो की त्यांनी चालवलेल्या मोहिमेत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. ११ एके ४७, तीन पिस्तुल, यूबीजीएल ग्रेनेडही हस्तगत करण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये कशाप्रकारे बाधा आणायची याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे,” असा दावाही सिंह यांनी केला. .
“सध्या लोकांना घाबरवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सुरक्षा दलानं यशस्वीरित्या सुरू केलेली ही मोहीम आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पाकिस्ताकडून अशाप्रकारच्या आणखी घटना होतील याची मला खात्री आहे. परंतु आपले जवान त्यांना दशतवाद्यांना ठार करतील,” असंही सिंह यांनी नमूद केलं. “जे नेते चीनच्या हस्तक्षेपाच्या गोष्टी करतात त्यांच्या मनात निराशा आहे. एकाप्रकारे ते आपली सद्सदविवेकबुद्धी गमावून बसले आहेत. आपण काय बोलत आहोत त्याची त्यांना कल्पनाच नाही आणि जे लोकं असं बोलत आहेत ते स्वार्थी आहेत. त्यांना ना देश दिसतो ना देशातील नागरिक. कशाही प्रकारे आपण पुन्हा गादीवर विराजमान होऊ असं त्यांना वाटत आहे. पुन्हा आपण लुटू आणि आपलं घर भरू असं त्यांना वाटत आहे. त्यांच्यासाठी आणखी कोणते शब्द नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“सर्वजण स्वार्थी आहेत. यापैकी काही जणांचा भूतकाळ पाहिला तर काही असे लोक आहेत ज्यांनी दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी केली होती. राजकारणात येऊन आपण काहीतरी बनलो आहोत असं काहींना वाटत आहे. हे लोक ना काश्मीरी जनतेसोबत आहे ना कोणत्याही देशवासीयांसोबत. ही अशी लोकं आहेत जे कायम उलटच बोलत राहणार. आम्हाला त्यांची काळजी नाही. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो विकास सुरू झाला आहे तो त्यांना पळवून लावेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“१९९० पासून पाकिस्तान भारताविरोधात दहशतवाद्यांना एकत्र करत आहे आणि ते काम पाकिस्तान सुरूच ठेवणार. त्यांना गोष्टी समजणार नाहीत. काहीशा पैशांसाठी तयार होणारे मुर्ख आणि अशिक्षित दहशतवादी त्यांना मिळतच राहणार. यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहावं लागणार आहे आणि देशवासीयांनादेखील,” असंही सिंह यांनी स्पष्ट केलं.
“पाकिस्तानात अंडर ग्राऊंड आणि ओव्हर ग्राऊंड वर्कर कोण आहे, कोण दहशतवाद्यांची साथ देत आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. संरक्षण यंत्रणा सातत्यानं यावर काम करत आहेत. ज्या प्रकारे लष्कर आणि पोलीस दलात समन्वय आहे ते अतिशय उत्तम उदाहरण आहे. असंही सिंह म्हणाले.