गुणसूत्र रचनेत बदल झालेला कोरोनाचा नवा विषाणू राज्यात ? ; आरोग्यमंत्री टोपे यांची शंका

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युटेशन आणि स्ट्रेन्समध्ये बदल होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. 

 

मुंबईत  पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे नमुने पाठवले असून अद्याप त्यांचं उत्तर आलं नसल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना  माहिती देण्याची विनंतीदेखील केली.

 

“अलीकच्या काळात काही गोष्टी लक्षात येत आहेत. घरी विलगीकरणात असताना अचानक अनेकांना श्वास घेताना त्रास होत असून धाप लागत आहे. ती व्यक्ती वाईट स्थितीत रुग्णालयात येते. म्युटेशन, स्ट्रेन्स बदललेत का अशी मला शंका आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राजील, युकेचा स्ट्रेन यांच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

 

“आम्ही एनसीडीकडे नमुने पाठवले असून अद्याप उत्तर आलेलं नाही. आम्हाला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत त्यामुळे तुम्हाला हा कोणता स्ट्रेन आहे सांगावं लागेल. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पुण्यात वेगळा आहे का? या सगळ्याचे नमुने आम्ही पाठवले आहेत. एनसीडीसीकडे याचे अधिकार आहेत. त्यांनी आपल्याला कळवलं पाहिजे. ही माझी जुनी मागणी असून याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आठवण करुन दिली. त्या अनुषंगाने उपचाराचे प्रोटोकॉल बदलायचे का हेदेखील ठरवता येईल,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 

म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत थोड्या प्रमाणात होणार बदल. लाखो लोकांच्या शरीरातून विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा व्हेरियंट्स म्हणतात.

Protected Content