धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा ‘वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा’ २०१९ – २०२०’ नुकताच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. शाळेतील मुलींनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर करत अतिथी मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय नाजूका भदाणे यांनी केला. शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी , प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा समन्वयक तथा बालकवी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी शाळेत वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचं अंतिम ध्येय आहे आणि त्यासाठी मी व माझा शिक्षक स्टाफ कसोशीने प्रयत्न करत असतो , असेही त्या म्हणाल्या. मागील वर्षात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वर्षभरात शाळेने विविध उपक्रम घेतले त्यात क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वेशभूषा स्पर्धा, गायन स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय क्रीडा प्रकारात काही विद्यार्थांनी यश संपादन करत जिल्हास्तरावर मजल मारली त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी सरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुढच्या वर्षी अजून मेहनत करावी असा उपदेश केला.
शाळेने केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांची देखील सरांनी स्तुती केली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक गटाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना पाटील यांनी तर उच्च प्राथमिक व माध्यमिक गटातील बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिरीन खाटीक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले तसेच जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी , रिबेका फिलिप , भारती तिवारी , अनुराधा भावे , ग्रीष्मा पाटील , रमिला गावित , स्वाती भावे , पूनम बाचपाई , पूनम कासार , शिरीन खाटीक , दामिनी पगारिया , नाजूका भदाणे , गायत्री सोनवणे , सपना पाटील , नाजनिन शेख , पुष्पलता भदाणे , लक्ष्मण पाटील , अमोल श्रीमावळे , सागर गायकवाड , इंद्रसिंग पावरा , अमोल देशमुख , सरला पाटील , शितल सोनवणे या सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.