अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये ८१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
अब्दासा, लिम्बडी, मोरबी, धारी, गधाडा, कर्जान, डांग आणि काप्राडा या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. दाखल झालेल्या १०२ उमेदवारी अर्जांपैकी २१ अर्ज सोमवारी मागे घेण्यात आल्याने ८१ उमेदवार रिंगणात उरल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
लिम्बडी मतदारसंघामध्ये सर्वाधिक चौदा उमेदवार रिंगणात असून, त्याखालोखाल मोरबी आणि गधाडा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १२, धारीमध्ये ११, अब्दासामध्ये १० आणि कर्जान व डांग येथे प्रत्येकी ९ उमेदवार आहेत. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या काप्राडा मतदारसंघामध्ये सर्वांत कमी चारच उमेदवार आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांकडून आठही जागा लढवण्यात येणार आहेत. काही लहान पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले असून, आठ मतदारसंघांमध्ये ५१ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.