मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील प्रसिध्द डॉक्टर शशांक मूळगावकर यांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. ५६ वर्षीय डॉक्टर मूळगावकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मूळगावकर हे अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉ. मूळगावकर हे बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. अनेक दिग्गज यांच्याकडून उपचार करुन घेत. मूळगावकर यांच्या निधनाने गिरगाव परिसरातील नागरिकांना एकच धक्का बसला आहे. शांत, संयमी आणि कार्यतत्पर, मदतीसाठी कधीही धावून येणारे मूळगावकर यांचे कोरोनाने निधन झाल्याचं वृत्त अनेकांना पचनी पडत नाही.
गेल्या सहा दिवसांपासून ते श्वास आणि हायपरटेंशनने ग्रासले होते. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मूळगावकर हे झोकून देऊन काम करत होते. दुर्दैव म्हणजे दोन दिवसांनी म्हणजे 3 जून रोजी त्यांचा वाढदिवस होता, मात्र त्याच्या काही दिवस आधीच त्यांना काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मूळगावकर यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने १८ मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना २४ मे रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.