जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दि. १७ – शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा घटक हा ग्रामसेवक आहे. गावचा शाश्वत विकास करायचा असेल तर ग्रामसेवकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. ग्रामसेवकांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव तालुक्याच्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते.
जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली जळगाव तालुक्यातील विविध विभागांच्या विकास कामांच्या संदर्भात बैठक संपन्न झाली. यात पंधरावा वित्त आयोग, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, घरकुल, समाज कल्याण, मातोश्री ग्राम समृद्ध पानंद रस्ते , आमदार निधीतील कामांच्या बाबत तसेच विविध विकास कामांच्या संदर्भात कामांचा आढावा घेण्यात आला.
पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीना १५ व्या वित्त आयोगातून ३७ कोटी ४९ लक्ष १० हजार ०७५ इतका निधी प्राप्त असून त्यापैकी १५ कोटी १८ लक्ष ४७ हजार ८६२ इतका निधी खर्च करण्यात आलेला असून शिल्लक निधी २२ कोटी ३० लक्ष ६२ हजार तात्काळ खर्च करून मुदतीत व दर्जेदार कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तर जलजीवन मिशनच्या अंतर्गत जळगाव तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीत ७८ पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यासाठी १०० कोटी ५५ लक्ष ८९ हजार ९५३ इतका निधी मंजूर आहे. सदर मंजूर ७८ पाणीपुरवठा योजना पैकी ४७ योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. तर जळके, तरसोद, वसंतवाडी व विटनेर अद्याप सुरु न झालेल्या या ४ योजना मुदतीत सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले. दरम्यान, मंजूर पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत व ग्रामसेवक पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने दर्जेदार पद्धतीने कामे करावीत. निकृष्ट कामे सहन केली जाणार नसून मुदतीत योजना पूर्ण कराव्या असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.
तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०२३ – २४ साठी २२ कामे मंजुरीसाठी प्रस्तावित आहे.. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त सार्वजनिक शौचालय बांधकाम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर करून मुदतीत व दर्जेदार कामे करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. तसेच तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०२२-२३ साठी ९० कामे मंजूर असून त्यासाठी ९ कोटी ५९ लक्ष ९८ हजार ०८७ इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी ५० कामे पूर्ण असून २२ प्रगती पथावर आहेत. दलित वस्ती सुधार योजनेतर्गत ६० गावांना २ कोटी ८० लक्ष निधी दलित वस्ती भागात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला असून सदरची कामे तात्काळ करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
तर तालुक्यात प्रधान मंत्री आवास योजना, शबरी घरकुल, रमाई घरकुल , अश्या एकूण ५६९५ घरकुल मंजूर असून त्यापैकी ३७६९ घरकुल पूर्ण करण्यात आलेली आहे. उर्वरित पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घ्यावा तसेच मनरेगा अंतर्गत २२ गावांमध्ये मंजूर कामांचाही आढावा घेण्यात आला. तसेच मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्त्यांच्या कामांची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, आवश्यकता असेल त्या गावांना तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी सुधळकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, ग्रामपंचायत विभगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील , गट विकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी रविंद्र भारदे, विस्तार अधिकारी रविंद्र सपकाळे, पद्माकर अहिरे, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, बांधकामचे उप अभियंता एस. आर. वंजारी, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता एस.पी. बोरकर सर्व शाखा अभियंता तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत करून बैठकीची रूपरेषा मांडली. आभार विस्तार अधिकारी रविंद्र सपकाळे यांनी मानले.