जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हातात गावठी पिस्तूल आणि जीवंत काडतूस सोबत घेवून भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उदय राजू उजलेकर (वय-२२) रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात संशयित आरोपी उदय उजले कर हा विना परवाना गावठी पिस्तूल आणि जीवंत काडतूस घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी पथकाला त्वरीत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ दिपक पाटील, महेश महाजन, पो.ना. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. रविंद्र पाटील, मुरलीधर बारी यांनी रात्री १० वाजता वरणगाव शहरात सापळा रचून संशयित आरोपी उदय राजू उजलेकर (वय-२२) रा. डॉ. आंबेडकर नगर, जळगाव याला अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ जीवंत काडतूस हस्तगत केले आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.