जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज । गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघा तरुणांसह विकणारा तरुण अशा तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ जून रोजी दुपारी २ वाजता जामनेर तालुक्यातील नेरी येथून ताब्यात घेतले आहे. गावठी पिस्टलसह तीनही संशयित आरोपींना आरोपींना जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शेखर राजेश सुके (रा. कंडारी ता. जळगाव) व गजानन रामेश्वर भोई (रा. नेरी ता. जामनेर) असे गावठी पिस्टल बाळगणा-या दोघांची तर योगेश श्रावण सोनार (रा. जामनेर) असे विक्रेत्याचे नाव आहे.
शेखर सुके आणि गजानन भोई हे दोघे तरुण जामनेर तालुक्यातील नेरी येथे गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहका-यांना नेरी येथे पुढील तपास व कारवाईकामी रवाना केले.
नेरी ते पहूर रस्त्यावरील हॉटेल रोहीणीच्या समोर असलेल्या पानटपरी जवळ गुरुवार १ जून रोजी दुपारी २ वाजता या दोघा संशयीत तरुणांना ताब्यात घेत विचारपूस करत त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांची विचारपुस व अंगझडती दरम्यान त्यांच्याकडे गावठी पिस्टल आढळून आले. अधिक चौकशीअंती ते पिस्टल त्यांनी जामनेर येथील योगेश सोनार याच्याकडून विकत घेतल्याचे दोघांनी कबुल केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जामनेर येथून त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. तिघांना गावठी पिस्टलसह जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.