चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगावले बुद्रुक, खेडीभोकरी पंचक्रोशीत व तापीकाठांवरील काही गावांमध्ये मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, वारावादळ,गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यांना आजवर नुकसान भरपाई मिळालेली नाही.ती त्वरित मिळावी, अशी आग्रही मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी पत्रकान्वये केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,१७ मार्च २०२० रोजी सायं.७ ते ८ वाजेदरम्यान ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, चक्रीवादळाचा तडाखा, लहान-मोठ्या गारांचा वर्षाव सुरू झाल्याने या भागातल्या गावांतील कच्च्या घरांची पडझड झाली, छतांवरील पत्रे उडाले, इलेक्ट्रिक पोल, डीपी, विज तारांचे जबरदस्त नुकसान झाले. शेतीतील सर्वच रब्बी पिके जमिनदोस्त झालीत. घरांचे छत व गच्चीवर तसेच शेतीतील खोलगट भागात दुसर्या दिवशी सुद्धा मिठागरांसारखा गारांचा खच पडलेला होता. अशी परीस्थिती असतांना अजुनही येथील गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
याबाबत संबंधित विभागाकडून तात्काळ १०० टक्के नुकसानीचे पंचनामे होऊन तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे समजते. परंतु अजूनही दमडीची मदत न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून गारपीटग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशीही अपेक्षा चोपडा बाजार समितीची माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.