गरूड महाविद्यालय व नगरपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथे गरुड महाविद्यालय व नगरपंचायत कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

अप्पासाहेब र. भा. गरूड महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी संविधानाने दिलेल्या नीती मूल्यांचा स्वीकार करून समाजहित कशा पद्धतीने जोपासता येईल, संविधानाने दिलेले मार्गदर्शक तत्त्वे आपल्या जीवनामध्ये आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शक ठरतात याची सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील होते. आपल्या भाषणात आपले संविधान हे सर्व समावेशक तत्वांचा अंगीकार करणारे आणि सर्व माणसांना जगवण्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राजेंद्र पाटील, ग्रंथपाल प्रा. धम्मा धारगावे , काकार्यालयीन अधीक्षक सतीश बाविस्कर, मुख्य लिपिक हितेंद्र गरुड सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि काही विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जिवरग यांनी केले.

नगरपंचायत कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

येथील नगरपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले व शपथ देवविली. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे , नगरसेवक निलेश थोरात, शरद बारी, सतीश बारी, श्रीकृष्ण चौधरी, तालुका उपाध्यक्ष सुनील शिनकर, धीरज जैन, पंडीत जोहरे, हभप शांताराम भगत, तुषार भगत, सर्व पत्रकार व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लिहण्याचा उदात्त हेतू व योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Protected Content