गरिबांना वाऱ्यावर सोडून लॉकडाऊन मान्य नाही — दरेकर

 

मुंबई :   वृत्तसंस्था । हातावर पोट असलेले गरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्यास लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांचं म्हणणं आहे

 

आज  एमपीएससी  परीक्षेबाबत बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु झाली. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही.असेही ते म्हणाले

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढतोय. विविध शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी कठोर निर्बंध लावूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याबाबत उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. दरम्यान, आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

 

 

 

प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील कोरोना स्थितीची माहिती त्यांना दिली. कोरोना आळा घालण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली होत आहेत. पण आधीच संकटात सापडलेला व्यापारी, छोटे व्यवयासिक देशोधडीला लागतील. त्यांच्यासाठी राज्य सरकारने काही ठोस भूमिका घ्यावी. हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावं. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी 5 हजार रुपये टाकावे, अशी मागणी यावेळी प्रविण दरेकरांनी केलीय.

 

राज्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे कोरोना लसीबाबत पाठपुरावा करावा. महाराष्ट्राला कोरोना लसीचा जास्तीचा साठा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी विनंती आपण राज्यपालांकडे केल्याचं दरेकरांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे देखील केंद्रीय आरोग्य विभागाच्या सातत्याने संपर्कात आहेत. मात्र, राज्य सरकारमधील काही लोक लसीचं राजकारण करत असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय.

 

राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.

Protected Content