मुंबई : वृत्तसंस्था । ‘मुंबईत बसून काही चॅनलवाल्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि माझ्याविरोधात गरळ ओकली. त्यांचा बोलाविता धनी वेगळा आणि पैसे पुरविणारा वेगळा आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
पोलिस तपासात हे लवकरच कळेलच, असेही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी हा आरोप केला. मुंबई पोलिसांच्या कारवाईचे त्यांनी सर्वप्रथम कौतुक केले. या कारवाईबाबत कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा उपचार आम्ही करू, असे सांगताना आता अनेक गोष्टी बाहेर येतीलच, असा इशाराही त्यांनी दिला.
घोटाळा उघड झाल्यावर अनेक जण गप्प का आहेत, असा प्रश्न करीत राफेल, थ्री जी, टु जी याप्रमाणे हा घोटाळा आहे. संबंधितांकडे पैसे कोठून आले, कोण पैसे वाटत होते, ड्रॅग रॅकेटमधून हे पैसे आले का, असे अनेक प्रश्न आहेत. आम्हा सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात करण्याच्या सुपारी पत्रकारितेचा हा परिणाम होता, असेही ते म्हणाले.
सीबीआयचे माजी संचालक आत्महत्या करतात आणि कोणाला प्रश्न उपस्थित करावासा वाटला नाही, याबाबत राऊत यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले. उदयनराजे, तसेच संभाजीराजे यांच्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत, प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य करणे योग्य नसल्याचेही राऊत म्हणाले. राज ठाकरे यांच्याकडे कोण जात असेल, तर त्यावर कोणाचे बंधन असण्याचे कारण नाही. कोणी कोणाकडेही जाऊ शकते, असे सांगताना ग्रंथालायबाबत अनेकांशी चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले.
बिहारमध्ये जवळपास ५० जागा लढवण्याची तयारी आहे. मी स्वतः पाटण्यात जाणार आहे. माझ्याबरोबर शिवसेनेचे इतर नेते-खासदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधन करतील, असेही राऊत यांनी सांगितले.