जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला फौजदाराला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
गडचिरोली पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर असलेल्या धनराज बाबुलाल शिरसाठ (मुळ रा.वराड, ता.धरणगाव) याची पत्नी संगीता उर्फ दिव्या हिने ७ मे रोजी दुपारी १ वाजता पोमके, ता.मुलचेरा येथे एके-४७ या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. बहिणीच्या आत्महत्येस तिचा पती धनराज, मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची प्रेयसी महिला पोलीस कर्मचारी,धनराजचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ,आई सुशिलाबाई हे जबाबदार असल्याची फिर्यादी भाऊ गणेश दगडू सपके (लक्ष्मी नगर, जळगाव) याने दिली आहे. त्यावरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, धनराज याला मंगळवारी अटक केल्यानंतर गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याची प्रेयसी व आई, वडील यांना अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक बजरंग देसाई करीत आहे.