गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हायवेच्या कामात शिवसेनेच्या हस्तक्षेपाचा आरोप

मुंबई प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून वाशीम जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमुळे महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 

केंद्रीय सडक वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे. यात म्हटले आहे की,  अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

यासोबत या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे असे गडकरींनी नमूद केले आहे.

पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणार्‍या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. तसेच या बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत असल्याचा इशारा गडकरींना दिला आहे.

हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल. ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी विनंती नितीन गडकरी यांनी या पत्रात केली आहे.

Protected Content