जळगाव : प्रतिनिधी । अॅडव्हान्स न दिल्याने रुग्णावर उपचार नाकारणाऱ्या आणि नियमानुसार बिल न देणाऱ्या शहरातील गजानन हॉस्पिटलची चौकशी करावी अशी तक्रार छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे
या तक्रारीत अमोल कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की शहरात अनेक खासगी रुग्णालयात रॅपिड अँटिजन चाचणीची परवानगी नसतांना रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा घेत चाचणी करणे. , रॅपिड अँटिजन चाचणीच्या माध्यमातून बेकायदेशीर व अवाजवी रक्कम वसूल करणे., रुग्णालयात उपचाराकरिता बेकायदेशीरपणे डिपॉझिटची एक रकमी मागणी करणे ., डिपॉझिट न भरल्यामुळे उपचार देण्यास नकार देणे., रुग्णांकडून वसूल केलेल्या रकमेचे बिल देण्यास टाळाटाळ करणे आणि रॅपिड अँटिजन चाचणीच्या माध्यमातून वसूल केलेल्या बेकायदेशीर रक्कमेचे चुकीच्या शीर्षकाखाली बिले देणे , असे प्रकार सर्रास सुरु आहेत
13 एप्रिलरोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मला सोपान महाजन ( रुग्णाचे नातेवाईक ) यांचा कॉल आला डॉ. विवेक चौधरी यांचे गजानन हॉस्पिटलमध्ये रुग्ण मारोती माळी या पेशंटची अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना ऍडमिट करण्यासाठी व पुढील ट्रीटमेंटसाठी डॉ. विवेक चौधरी 30000/- रुपये डिपॉझिट मागत आहेत .परंतु रुग्णाची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना इतक्यारात्री इतकी रक्कम देणे शक्य नव्हते तरीही जवळपास निम्मी रक्कम तात्काळ जमा करून उर्वरित रक्कम रुग्णाचे नातेवाईक सकाळी जमा करतील अशी विनंती डॉ. विवेक चौधरी व हॉस्पिटल व्यवस्थापनकडे करूनही डॉक्टरांनी ऍडव्हान्स जमा केल्याशिवाय पेशंट ऍडमिट व ट्रिटमेंट सुरु होणारच नाही अशी आडमुठेपणाची भूमिका घेत मुजोरी करण्यात आली.
गजानन हॉस्पिटलमध्ये रॅपिड अँटीजन चाचणीची परवानगी नसतांनादेखील जाणीवपूर्वक अँटीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी 1200/- रुपये , ECG साठी 300/- रुपये व तपासणी फी 1000 /- रुपये असे एकूण 2500/- रुपये रुग्णाकडून वसूल करण्यात आले . शासन निर्णय ( क्र. कोरोना -2020/ प्र. क्र.123/आरोग्य- 5 , दिनांक : 31 मार्च 2021 ) नुसार रॅपिड अँटीजन टेस्टसाठी 150/- रुपये रक्कम निर्धारित करण्यात आलेली आहे मात्र या रुग्णालयाकडून 1200 /- रुपये बेकायदेशीरपणे घेत आर्थिक लूट करण्यात आली आहे.
रुग्णाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने रुग्णालयाला डिपॉझिटची रक्कम प्राप्त न झाल्याने रुग्णालयाकडून रुग्णाला उपचार नाकारण्यात आले .त्यामुळे रुग्णाची परिस्थिती गंभीर असतांना मध्यरात्री 12.30 वाजता अँबुलन्स उपलब्ध नसतांनादेखील रुग्णाला उपचाराविना रुग्णालय सोडण्यास भाग पाडण्यात आले .
रूग्णाला उपचारासाठी अन्यत्र हलवून दुसऱ्या दिवशी रुग्णाचे नातेवाईक गजानन हॉस्पिटलमध्ये बिल घेण्यासाठी गेले व्यवस्थापनाकडून बिल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.आक्रमक झाल्यावर रुग्णास रॅपिड अँटिजन चाचणीच्या माध्यमातून वसूल केलेल्या बेकायदेशीर व अवाजवी रकमेचे चुकीच्या शीर्षकाखाली बिल देण्यात आले .
सबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापक यांनी बेकायदेशीर शुल्क वसूल करत डिपॉझिटच्या मनमानी वसुलीसाठी उपचार नाकारून सेवेत हलगर्जीपणा केलेला आहे. बेकायदेशीर वसूल रकमेची चुकीच्या शिर्षकाखाली बिले देत रुग्णाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे ऑडिट करून संबंधित व्यवस्थापक यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे