बेंगळुरू वृत्तसंस्था । कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला भारताकडे सुपुर्द करण्यात आले असून त्याला बेंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुजारी विरोधात कर्नाटकात ३९, मंगळुरु येथे ३६, उडिपी ११, मुंबई ५० आणि गुजरात येथे ७५ असे मिळून २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पुजारीला पश्चिम आफ्रिकेच्या सेनगेल येथे अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर पुजारीने पलायन केले होते. अखेर त्याला अटक करण्यात आली होती. त्याला एअर फ्रान्सच्या विमानाने दिल्लीत आणले गेले. तेथून त्याला बंगलोर येथे नेण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे आणि बंगलोरचे सहआयुक्त (गुन्हे) संदीप पाटील हे अधिकारी आज पुजारीला कोर्टात हजर करणार आहेत.
रवी पुजारी हा विदेशात अंथोनी फर्नांडिस या नावाने वावरायचा. त्याच बनावट नावाने त्याने खोटा पासपोर्ट बनवला होता. त्याने मलेशिया, पश्चिम आफ्रिका, थायलंड या देशात स्वतःचे नेटवर्क तयार केले होते. पुजारी हा पूर्वी अंधेरीत राहत होता. सुरुवातीला तो छोटा राजन टोळीसाठी काम करत होता. मात्र २००६ ला रोहित वर्माच्या हत्येनंतर तो वेगळा झाला. आता भारतात आणल्यानंतर त्याची एनआयए, सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे.