जळगाव प्रतिनिधी । शहरातील बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांना खंडणी मागत त्यांच्यावर प्राणघातक हल्लाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी नगरसेवकास शहर पोलीसांनी आज अटक केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील व.वा. वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखाना आवारात व जिमखान्यात बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या (वय-५१) रा. टीएम नगर सिंधी कॉलनी यांना खंडणी मागत त्यांच्यावर प्राणघातक हल्लाची घटना १६ जानेवारी २०२० रोजी घडली होती. या गुन्ह्यात फरार संशयित आरोपी नगरसेवक प्रवीण देविदास कोल्हे (वय ३२, रा.कोल्हेवाडा, जुने जळगाव) याला सोमवारी २० रोजी पहाटे शहर पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागीतल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागीतली होती. १६ जानेवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गोरजाबाई जीनखाना येथे साहित्या गेले होते. यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तुची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आत्तापर्यंत चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे सध्या कारागृहात आहेत. तर सोमवारी नगरसेवक प्रवीण कोल्हे याला अटक केली. नगरसेवक प्रविण कोल्हे याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अरुण निकम तपास करीत आहेत.