खुनाच्या गुन्ह्यात एकाच कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप !!!

 

जळगाव- प्रतिनिधी । दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने पाच जणांनी चाकु भोसकुन २२ वर्षीय तरुणाचा खुन केला होता. या गुन्ह्यात एकाच कुटंुबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यात दोन महिला आरोपींचा समावेश आहे.

अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जे. कटारीया यांनीं शनिवारी ही शिक्षा ठोठावली सत्त्यासिंग मायासिंग बावरी (वय ४५), रवीसिंग मायासिंग बावरी (२७), मलीनसिंग मायासिंग बावरी (२५), मालाबाई मायासिंग बावरी (६३) व कालीबाई सत्त्यासिंग बावरी (वय ४३, सर्व रा. राजीव गांधीनगर, समतानगर परिसर) अशी जन्मठेप झालेल्या दोषींची नावे आहेत.

राहुल प्रल्हाद सनकत (वय २२, रा. राजीव गांधीनगर, समतानगर परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. १२ जूलै २०१७ रोजी रात्री नऊ वाजता राहुल परिसरातील एका टेकडीवर जेवण करीत बसला होता. यावेळी सत्त्यासिंग बावरीने त्याच्याकडे जाऊन दारु पिण्यासाठी पैसे मागीतले. राहुलने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सत्त्यासिंगने त्याला शिवीगाळ केली होती. राहुलनेही त्याला शिवीगाळ केली. यानंतर राहुल घरी आला होता.

त्यानंतर पुन्हा रात्री १० वाजेच्या सुमारास सत्त्यासिंग त्याची पत्नी कालीबाई, आई मालाबाई, भाऊ रवीसिंग व मलीनसिंग हे पाचही जण राहुलच्या घरी गेले. त्यांनी राहुलला घरातून बाहेर काढत मारहाण सुरू केली. राहुलची आई माळसाबाई यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही भिंतीवर ढकलुन देत जखमी केले. यांनतर सत्त्यासिंगने राहुलच्या पोटात चाकु भोसकुन त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेमुळे परिरसातील लोकांची गर्दी झाल्याने मारेकरी बावरी कुटंुबीय पळुन गेले. जखमी राहुल याला कुटंुबीयांनी सिव्हील हॉस्पीटल व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे १३ जूलै रोजी त्याला मुंबईला हलवले होते. नाशिकजवळ पोहोचल्यानंतर त्याचा वाटेचत मृत्यू झाला.

यानंतर नाशिक रुग्णालयातच शव विच्छेदन करण्यात आले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुरूवातीला प्राणघातक हल्ला व राहुलच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. खटला सुरु होण्यापूर्वी महिला संशयित मालाबाई व कालीबाई यांना जामीन मिळाला, सत्त्यासिंग, रवीसिंग व मलीनसिंग हे न्यायालयीन कोठडीतच आहेत.

१ ऑक्टोबर २०१७ रोजी पोलिसांनी न्यायालयात दोषारोप सादर केले. सरकारपक्षाने एकुण १४ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने पाचही संशयितांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी तर आरोपींतर्फे अॅड. हिंमत सुर्यवंशी, केदार भुसारी व प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.

Protected Content