जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली गावाजवळ चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा अपघात झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी दुपारी घडली होती. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा खाजगी बस धावतात. बुधवारी ३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाचोराकडे जात असलेल्या एका खाजगी बस (एमएच १२ ईएफ ४४३३) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडक दिल्याची घटना शिरसोली गावाजवळील पेट्रोलपंपानजीक घडली आहे. अपघातानंतर वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला होता. यात रिना श्रीराम मोहन (वय-१५) रा. पाचोरा, नुरबानो जमील बागवान (वय-४४), नम्रा जमील बागवान (वय-२०) रा. पाचोरा आणि ओंकार तुकाराम पाटील (वय-६५) रा. जाम्हणे ता. पाचोरा हे प्रवासी किरकोळ जखमी झाले होतो. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी योगीता नामदेव मराठे रा. पाचोरा या तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता खासगीबस वरील अज्ञात चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.