खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मिशन ओ 2 या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने, रिलायन्स गृप व खामगाव नगर पालिकेच्या सहकार्याने शहरात ग्रीनॅथॉन या नावीन्यपूर्ण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
हजारोंच्या संख्येने शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण -तरुणी, महिला – पुरुष -प्रौढांसह अगदी चिमुकल्यांपासून ७५ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरीकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
आपल्या पतीच्या वैद्यकीय इलाजासाठी वयाच्या ६५ व्या वर्षी बारामती येथील मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या लता करे ह्या या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होत्या. त्यांच्या हस्ते सकाळी साडेसहा वाजता गारडगाव फाटा येथून हिरवी झेंडी दाखवून ग्रीनॅथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसिलदार हेमंत पाटील व पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते .सहा किलोमीटर धावत जाऊन सर्व सहभागी स्पर्धकांनी व मान्यवरांनी किन्ही महादेव फाट्यावर ११११ झाडे लावली.
शारीरिक सुदृढतेसोबतच पर्यावरण रक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने माळरानावर वृक्षारोपण करण्याचा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारोह खामगाव येथील दानशूर व्यक्तिमत्व बिपिनजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. लताबाई करे ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या.
त्यांचेसह डॉ.मुरहरी केळे (संचालक, वाणिज्य महावितरण मुंबई ), राजकुमारी चव्हाण (अध्यक्ष मानिनी ग्रुप ), हातोडे (नगरपरिषद खामगाव ), किशोर पडोळ (वनपरिक्षेत्र अधिकारी ), वाघ (ठाणेदार ,पोलीस स्टेशन हिवरखेड ), मुक्तेश्वर कुलकर्णी, गोपाल हटकर, इंजि. दिनोरे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मिशन ओ 2 चे संस्थापक आणि ग्रीनॅथॉनचे आयोजक डॉ. कालिदास थानवी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला.
या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून रिलायन्स गृपचा सहभाग होता. न.प. खामगावचे मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांनी न. प. च्या वतीने वृक्षारोपणासाठी ८०० वृक्ष पुरविले. उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाईकनवरे व हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघ, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर कुळकर्णी यांच्यासह विविध बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा आणि इतर सर्व मान्यवरांचा डॉ. थानवी यांनी प्रास्ताविकातून गौरवपूर्ण रीतीने उल्लेख करून आभार मानले.
राजकुमारी चौहान यांनी आयोजकांचे कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी डॉ. मुरहरी केळे यांचेही समयोचित भाषण झाले. लता करे यांनी आपल्या भाषणात आयुष्यातील संकटांचा सामना करताना सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व विशद केले आणि ग्रीनॅथॉनसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल डॉ. थानवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
ग्रीनॅथॉनच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या विविध शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्था आणि काही व्यक्तींचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रीनॅथॉन स्पर्धेतील महिला व पुरुष गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार व तीन हजार रुपयांची रोख पारितोषिके व पदक देऊन गौरवण्यात आले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना पदके प्रदान करण्यात आली. महिला गटामध्ये प्रथम पारितोषिक परभणीच्या अश्विनी जाधव हिने, द्वितीय अमरावतीच्या सलोनी लव्हाळे हिने तर तृतीय परभणीच्याच निकिता म्हात्रे यांनी पटकावले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
पुरुष विभागात अमरावतीचा प्रदीप राजपूत अजिंक्य ठरला. द्वितीय क्रमांकावर संभाजीनगरचा ऋषभ तिवसकर आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या राजू धनवे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व पदक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी श्रीमती लता भगवान करे यांचा विविध संस्था आणि व्यक्तींच्या द्वारे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी आणि आभारप्रदर्शन डॉ. गायत्री थानवी यांनी केले.