खानचा बाजार उठवाच ! : दिलीप तिवारी यांची दणदणीत पोस्ट

जळगाव । महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आजवर अनेकदा वादग्रस्त ठरलेले निरिक्षक खान यांनी काल टरबूज विक्रेत्या शेतकर्‍यांना दिलेल्या वागणुकीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. राजकारणी यावरून सोयीची भूमिका घेत असले तरी या प्रश्‍नाच्या मुळाशी कुणीही जातांना दिसत नाही. नेमक्या याच भयाण वास्तवावर या प्रकरणातील अनेक कंगोर्‍यांचा आधार घेत, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी केलेले भाष्य आपल्यासाठी सादर करत आहोत.

कोरोना महामारीशी दोन हात करताना सामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झाले आहे. हाताचा रोजगार थांबलेला आणि स्वयंरोजगारावर काही प्रतिबंध आहेत. अशावेळी प्रशासकीय व्यवस्थेने समंजस व समन्वयाची भूमिका निभावली पाहिजे. परंतू लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पातळीवर तसे घडताना दिसत नाही. ज्याला-त्याला सत्तेची मस्ती आणि अधिकारांचा माज असल्याचाच अनुभव येतो आहे.

जळगाव शहरात फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांचे अतिक्रमण काढण्याच्या दोन घटना गेल्या महिना भरात घडल्या. रस्त्यावर सत्तेची मस्ती करताना आमदार सुरेश भोळे व काही उत्साही कार्यकर्ते दिसले. दुसरीकडे अधिकारांचा माज दाखवताना मनपाचे अतिक्रमण हटाव पथकाचे कर्मचारी खान दिसले. सोशल मीडियात या दोन्ही घटनांचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. प्रतिबंधाच्या काळात आमदार भोळेंच्या समोर ठराविक फळ विक्रेत्यांच्या टोपल्या व डबे अतिक्रमण हटाव पथक उचलत असल्याचे एका व्हिडिओत दिसले. त्यात गयावया करताना विक्रेतेही दिसले. दुसऱ्या व्हिडिओत मनपाचा कर्मचारी खान शेतकऱ्याशी अरेरावी करताना दिसतो. शेतकऱ्यानेही रस्त्यावर टरबूज टाकलेले दिसतात. या दोन्ही घटना दिसतात तेवढ्या सोप्या नाहीत. यामागे हप्तेखोरीसह धार्मिक विवाद हे कारणही आहे. जळगाव शहराने यापूर्वी सन १९९२ मध्ये आमदार स्वतःच अतिक्रमण काढायला गेल्यानंतर उद्भवलेले विवाद अनुभवले आहेत. हा अनुभव समोर असताना आमदार भोळे अतिक्रमण हटाव ठिकाणी का गेले ? हा प्रश्न आहेच. सुभाष चौक भागात दुकानदारांच्या शेडचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही होत असताना आमदार तर विरोध करायला गेले होते. मग नंतर उलटी भूमिका कशासाठी ?

जळगाव शहरात रस्त्यावरील बांधीव, तात्पुरत्या अतिक्रमण सोबत रस्त्यावर बसणारे व फिरणारे अनधिकृत विक्रेते यांची मोठी समस्या आहे. हप्तेखोरीचा आणि बगलबच्चे पाळण्याचा खेळ यात सुरु असतो. बळीरामपेठेतील तसेच टॉवर चौकालगत रस्त्यांवरील विक्रेते, फेरीवाले आणि फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील पाथवे बळकावणारे विक्रेते कोणाचे, कोण ? याचा सखोल तपास केला तर अतिक्रमण कसे वाढते ? आणि कोण भाड खाऊ (भाडे घेणारा या अर्थाने) ? कोण हप्ता खाऊ (केवळ रक्कमच नाही तर वस्तू रुपानेही हप्ता घेणारे) ? हे लक्षात येते. खान हा कर्मचारी अतिक्रमण हटाव विभागातला अचल स्तंभ आहे. गेल्या ३० वर्षांत अतिक्रमण हटावच्या अनेक कहाण्या रंगल्या, खानाचे केस पांढरे होऊन रंगले पण रस्ते काही मोकळे झाले नाहीत.

शेतकऱ्याचे टरबूज टरबूज फेकणे, ते सुद्धा रमझान महिन्यात असे करणे या मागे काही छुपी कारणे आहेत. आमदाराने सत्तेच्या मस्तीतून केलेल्या क्रियेला अधिकाराच्या माजातून दिलेली प्रतिक्रिया आहे. कोरोना महामारी नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरु आहे. बाजारपेठ व रस्त्यांवरील वर्दळ मंदावली आहे. अशा काळात रस्त्यांवरील अतिक्रमणाचा त्रास कोणालाही नव्हता. दुसऱ्या टप्प्यात फळे-भाजी विक्री सुरु झाली. बाजार बंद असल्यामुळे रस्त्यावर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली. तेव्हा तबलिगींमुळे कोरोना वाढला हा प्रचार होता. विशिष्ट विक्रेत्यांकडून भाजी-फळे घेऊ नये असा विखारी प्रचार झाला. याच दरम्यान गोलाणी मार्केट समोर (हनुमान मंदिर परिसरात) नेहमीच्या फळ विक्रेत्यांविषयी नाराजी सुरु झाली. रस्त्यांवर यांनी बसू नये, त्यांनी बसू नये अशी मागणी झाली. आमदार भोळे तेथे पोहचले. अतिक्रमण हटावचा फटका विशिष्ट लोकांना बसतोय असे चित्र तयार झाले. त्याचवेळी टोपलीवाल्या विक्रेत्यांना संरक्षण मिळाले. आमदाराचा दिवस धकून गेला. तेव्हा गुढीपाडवा, एकादशी, आखाजीचे सण तोंडावर होते. फळांचे भाव तेजीत होते. जे पारंपरिक विक्रेते होते, त्यांची रोजीरोटी हिरावली गेली. हे वास्तव लक्षात घ्या.

आता रमझान महिना सुरु आहे. आताही फळांची मागणी जोरात असते. रोजा इफ्तारमध्ये फलाहार असतो. त्यात टरबूज दुहेरी उपयोगाचे असते. स्वस्त व पाणीदार असल्याने त्याचा जास्त वापर होतो. अलिकडे बहुतांश शेतकरी स्वतःच टरबूज विक्रीस आणू लागले आहेत. आवक वाढली की भाव घसरतात. पारंपरिक विक्रेते अशा हंगामी विक्रेत्यांवर राग धरुन असतात. त्यात सोशल मीडियातून विखारी संदेश सुरु असतात, ‘यांच्याकडून घेऊ नका, त्यांच्याकडूनच घ्या’. कोरोनामुळे बाजारपेठ ही विक्रेता व ग्राहकाच्या जात, धर्मात विभागणे सुरू झाले, हे सत्य आहे. यात अधिक विवादाची भर हलाला किंवा हिंदू वस्तू विक्रेता हे तथाकथित प्रमाणपत्र घालणार आहे.

आमदाराने काढलेले फळविक्रेत्यांचे अतिक्रमण आणि खान याने काढलेले टरबूज विक्रेत्या शेतकऱ्याचे अतिक्रमण ही यामागील छुपी कारणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी टरबूजवाल्या शेतकऱ्यासाठी धावून गेले. फळवाल्यांना हटवायला शिवसेनेचे पदाधिकारी होते. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. अतिक्रमण हटावबाबत दोघांची भूमिका परस्पर विरोधी आहे. तरीही राष्ट्रावादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे केले ते पटणारे आहे. आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने फुले व सेंट्र फुले मार्केट, बळीराम पेठ, सुभाष चौक, टॉवर चौक येथील अनधिकृत विक्रेत्यांच्या विरोधात वा पर्यायी जागेसाठी नागरी हिताची भूमिका घ्यावी. हे करताना अगोदर खान याचा बाजार उठविणे आवश्यक आहे.

दिलीप तिवारी, जळगाव

आमदार अतिक्रमण हटविताना आमदार भोळे

https://www.facebook.com/100015709097454/videos/766442623889367/

शेतकऱ्याने मनपा समोर टाकलेले टरबूज

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2588436724743263

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content