खाद्य सुरक्षेची संरचना नष्ट करण्याचा प्रयत्न

 

 

पतियाळा: वृत्तसंस्था । मोदी सरकार कृषी कायद्यांच्या माध्यमातून देशातील खाद्य सुरक्षेची संरचना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असून या भूमिकेमुळे पंजाब राज्याला मोठे नुकसान होईल, हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवरील हल्ला आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू असून पंजाबात असलेले राहुल गांधी आज हरयाणात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे हे अभियान मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्यांविरोधात आहे. मोदी सरकारने प्रथम नोटाबंदी केली. त्यानंतर जीएसटी आणि आता हे तीन कृषी कायदे आणण्याच्या प्रयत्नांत हे सरकार आहे. आम्ही पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांची लढाई लढत असल्याचे राहुल म्हणाले.

 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी करोनाबाबत काही मुद्दे मांडले तेव्हा माझी चेष्टा केली केली. २०-२१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई संपेल असे एक व्यक्ती म्हणत आहे, त्या व्यक्तीला हे माहीत नाही की कोरोना काय आहे.

मला असे वाटते की स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कृषी कायदे काय आहेत हे समजलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ६ महिन्यांनंतर देशात ना रोजगार असेल ना जेवण. याचे कारण म्हणजे संरचना तोडण्यात आलेली आहे. मात्र मी जे काही बोलत आहे त्याची चेष्टा उडवली जाईल. मोदी सरकारने या कायद्यांच्या आधारे सर्वकाही तोडून टाकले आहे. आज बाजारांची संख्या कमी आहेत, काही ठिकाणी भ्रष्टाचार आहे, मात्र किल्लाच तोडून टाकला तर मग शेतकरी वाचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ अंबानी-अदानी यांच्यासाठी मार्ग स्वच्छ करण्याचे काम करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

हाथरसच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरले. संपूर्ण देशालाच मारले जात आहे, मग मला धक्का मारणे ही मोठी गोष्ट नाही, असे राहुल गांधी म्हणाले. एखाद्याच्या मुलाची किंवा मुलीची हत्या केली जाते, त्यानंतर आई-वडिलांना बंद केले जाते आणि त्यांना घाबरवले जाते. सर्व निघून जातील आणि केवळ आम्हीच येथे राहू असे सांगितले जाते, असे म्हणत याच कारणामुळे आपण हासरथला गेलो आणि पीडित कुटुंबाच्या बाजूने उभे राहिलो प्रशासनाने येथे इतक्या चुकीच्या गोष्टी केलेल्या असतानाही पंतप्रधान मोदी एक शब्द बोलत नाहीत ही आश्चर्याची गोष्ट असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

Protected Content