खाटा, व्हेण्टिलेटरसाठी राज्यात चोख कामगिरी

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना मुकाबल्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतला तरीही राज्याने गोळ्या, ऑक्सिजन सुविधेंच्या खाटा, व्हेण्टिलेटरसाठी चोख कामगिरी बजावली उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी केंद्र सरकारची या राज्यांवर कृपादृष्टी आहे!

कोविडसाठी भारतात १५ हजार ४२९ वैद्यकीय सुविधा आहेत. त्यापैकी ३३६० सुविधा महाराष्ट्रात आहे. हे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विलगीकरण खाटांमध्येही राज्याने चांगली कामगिरी केली भारतामध्ये विलगीकरणासाठीच्या खाटा १५ लाख ५६ हजार १०१ असून, त्यापैकी ३ लाख ४९ हजार ८२० खाटा महाराष्ट्रात आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या देशातील खाटांची संख्या २ लाख ३३ हजार २५ आहे. महाराष्ट्रातील ही संख्या ५६ हजार ६०२ आहे तमिळनाडूमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्या म्हणजे २५ हजार ४०७ ओटू खाटा आहेत. आयसीयू खाटांची संख्या देशात ६३ हजार ५२६ आहे. त्यापैकी राज्यात या आयसीयू खाटांची उपलब्धता १४ हजार ८३४ आहे.

व्हेण्टिलेटरसाठीही केंद्रांकडून पुरेशी मदत मिळाली नसताना राज्याच्या सरकारी, खासगी आरोग्य यंत्रणेने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ६ हजार ९२४ व्हेण्टिलेटर उपलब्ध केले होते. देशात ही संख्या ३२ हजार ४५० इतकी आहे. येथेही देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रमाण २१.३३ टक्के आहे.

तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या पाच लाख असून, महाराष्ट्राच्या तुलनेत निम्मी आहे. तरीही सर्वाधिक निधी तमिळनाडूला देण्यात आला. उत्तर प्रदेशमध्येही महाराष्ट्राशी तुलना करता रुग्णसंख्या कमी असली तरीही पीपीई, एचक्यूसी गोळ्या उपलब्ध करून देताना राज्यापेक्षा तेथे सात टक्के अधिक वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या.

निधी वाटपाप्रमाणे औषधे, एन-९५ मास्क, पीपीई किट, व्हेण्टिलेटर तसेच इतर यंत्रसामुग्रीच्या वितरणामध्येही दुजाभाव करण्यात आला भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी २१.८७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहे. सीएफएक्सआयव्हीडी आरटीपीसीआर यंत्रासाठी भारतात ७.३ कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ ७६ लाख रुपये आले. अॅटोमेटेड आरएनए यंत्रासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातील ४.२१ कोटी रुपयेच महाराष्ट्राला मिळाले.

Protected Content