जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात आपत्ती निवारण कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र काही खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवत आहे. त्यामुळे नागरीकांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत. अन्यथा त्यांचेवर या कायद्यान्वये गुन्हे दाखल करावे लागतील. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या इतर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. हे नागरीक जीथे असतील तीथेच त्यांना राहण्याची व इतर व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजबावणी करा. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थिती डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. तथापी, जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर ओपीडी करत नसल्याने तसेच नर्सिग स्टॉफ कामावर येत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांवर कठोर कारवाई करावीच लागेल. लॉकडाऊन सुरु असूनही शहरी भागात काही विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी फवारणी करीत आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. यापुढे महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत सोडून इतरांना फवारणी करता येणार नाही. ज्यांना ईच्छा असेल त्यांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. तातडीची आवश्यकता म्हणून आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्बुलन्स आरोग्य यंत्रणेने ताब्यात घ्याव्यात. आरोग्य यंत्रणेसाठी लागणारे पीपी किट, मास्क, सॅनेटायझरची मागणी तातडीने नोंदवा. जिल्ह्यातील चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर येथील उप जिल्हा रुग्णालयाची आवश्यक ती दुरुस्ती करुन त्याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव जिल्हावासियांची लॉकडाऊनच्या तंतोतत अंमलबजावणीची साखळी मजबूत राहिली पाहिजे असा निश्चय सर्वांनी करावा. ज्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांची गर्दी होत असेल तेथील गर्दी कमी करण्यासाठी मार्केटची जागा बदल्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. जेष्ठ नागरीक व दिव्यांगाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिकेने हेल्पलाईन क्रमांक सुरु कावा. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.