मुंबई , वृत्तसंस्था, । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत. . ‘खडसे हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते मूळचे भाजपचे नाहीतच,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
‘खडसे हे एस काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांनी जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली होती, तेव्हा खडसे हे एस काँग्रेसमध्येच होते. मी मूळचा भाजपचा आहे आणि खडसेंना सीनियर आहे. खडसे, मुंडे यांच्यासह आम्ही अनेकांनी एकत्र काम केलं असल्यामुळं आमच्या एकमेकांच्या वाटचालीबद्दल माहीत आहे,’ असंही दानवे म्हणाले.
भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याच्या खडसेंचे आरोपही दानवे यांनी फेटाळले. ‘माझ्या पोटात अनेक गोष्टी आहेत, ज्या फडणवीसांना मान्य नव्हत्या. पण त्यांना सांगितल्यावर त्यांनी त्या मान्य केल्या. त्यामुळं फडणवीस एकटे निर्णय घेतात असं म्हणणं चुकीचं आहे. भाजपमध्ये सामूहिक निर्णय होतो. आधीही कधी एक व्यक्ती निर्णय घेत नव्हती, आताही घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही,’ असंही दानवे म्हणाले.