जळगाव : प्रतिनिधी । राज्य सरकारची दिशाभूल करताना महसूल खाते आणि महापालिकेतील चेले -चपाटे हाताशी धरून श्रीकांत खटोड आणि बंधूंनी मेहरूण मधील खुल्या भूखंडाच्या बांधकामाचा ३० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे असा जाहीर आरोप आज महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला .
यावेळी अजय ललवाणी व सरीत सरकार पुढे म्हणाले की , कोणताही लेआउट तयार करताना त्यावेळच्या ( सन – १९७३ ) शासकीय नियमानुसार 15 टक्के खुली जागा सोडणे कायदेशीर बंधनकारक असताना येथील बांधकाम व्यवसायिक श्रीराम व श्रीकांत खटोड या बंधूंनी शिरसोली रोडवरील रहिवासी असलेल्यांचे वापराची हक्काची जागा लाटून अनधिकृत बांधकाम करीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार धाकदपटशा व राजकिय वजन वापरून केला आहे,
शिरसोली रस्त्यावर असलेली संबंधित ( सर्व्हे न ४१३ मधील आरक्षण क्रमांक १४५ ) जागा 1973 ते 2008 दरम्यान नगरपालिकेची ओपन स्पेस म्हणून वापरात होती. शासन नियमानुसार बारा वर्षे कब्जे वहिवाटीत जागा असली तर त्या जागेचे स्वामित्व वहिवाटदारांच्या हक्कांच्या आपोआपच बहाल होते. असे असताना जागेचा उतारा मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या नावावर होता. तो परस्पर बेकायदेशीरपणे बदलविण्यात आला. तो बदलताना शासनाची परवानगी, महापालिकेचा ठराव हे न करता दिनेश गजानन जोशी यांच्या नावे करण्यात आला. त्यातून खरेदी खताद्वारे श्रीराम, श्रीकांत खटोड व राम सहाय शर्मा यांच्या नावे वर्ग करण्यात आला.
: शासनाच्या नगरविकास विभागाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास खात्याचे कार्यासन अधिकारी प्रणव कर्पे यांनी 23 नोव्हेंबर 2020 रोजी मेहरुण शिवारातील या खुल्या जागेचे रहिवास भूखंडमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ थांबवून जैसे थे चे आदेश दिले होते. 30 दिवसांच्या आत चौकशी अहवाल संचालकांच्या मार्फत सादर करावा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र कोणताही चौकशी अहवाल आजपर्यंत महापालिका प्रशासनाने न देता त्या जागेवर अजूनही बांधकाम सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी, सत्ताधारी पक्षाचे तसेच खटोड बंधू यांच्याशी लागेबांधे असल्याने शासन निर्देशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. श्री लेक कॅसल नावाने हे बांधकाम विकसित केले जात आहे जवळपास 30 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा हा भ्रष्टाचार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
याच मुद्द्यावर आम्ही उच्चं न्यायालयात धाव घेतली आहे परंतु न्यायालयापुढे महापालिकेचे म्हणणे मांडले जाणे बाकी आहे त्यामुळे जास्त सांगता येणार नाही असेही ते म्हणाले .
खटोड बंधू यांच्यासारखी महापालिकेतील डोळे पांढरे करणारी ९ प्रकरणे आपल्या रडारवर आहेत अभ्यास चालू आहे यथावकाश सगळी मुद्देसूद माहिती आम्ही जगजाहीर करणार आहोत असेही त्यांनी सांगितले .
यावेळी राजेश ललवाणी , सुमित मुठा , पुनीत ललवाणी , सरीत सरकार यांचीही उपस्थिती होती