खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिवाळ्यात मार्गशीर्ष मासाची सुरूवात होताच पाचोरा तालुक्यात काकणबर्डीवर चंपाषष्टीला खंडोबाच्या यात्रेपासून सुरवात होते. नंतर तालुक्यातील गोराडखेडा, सावखेडा, माहेजी देवी यात्रांचा भर पडते. आज २९ डिसेंबर मंगळवार रोजी काकणबर्डी याञोत्सव आहे. मंदीराच्या विश्वस्तांकडून यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

काकणबर्डी देवस्थानाला पौराणिक कथेचा आधार
पाचोरा शहरापासून अवघ्या २ ते ३ कि. मी. अंतरावर व गिरड रस्त्याच्या कडेला उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार असलेल्या व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबा अवताराचे मंदिर असून कथानकातील अख्यायीके नुसार याच टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसर्‍या विवाहाचे हाताचे काकण सोडले असल्याने या टेकडीला “काकणबर्डी” असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली. मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टीला येथे मोठ्या भक्तीभावात भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी, रोषणाई, झेंडूची फुले, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात हळद – खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलून आरती व सदानंदाचा येळकोट – येळकोट चा गजर भाविक घरोघरी करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढविला जातो. या दिवशी टेकडीवर व परिसरात यात्रेचे स्वरुप असते.

यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा
काकणबर्डी देवस्थान परिसराह जिल्हयात व राज्यात असलेल्या मल्हार भक्तांचे श्रद्धास्थान असून पौष महिन्यातील चंपासष्टीला या यात्रेत राज्यभरातून भाविक दर्शनास येतात. या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून पुर्वी या टेकडीवर लहानसे पुरातन मंदिर होते. भाविकांनी श्रद्धेतून या मंदिराचा जिर्णोद्धार केला व त्यानंतरही दानशुरांच्या व भाविकांच्या संयोगातून मंदिराच्या बांधकामात बदल करून सभागृह असलेल्या मंदिर साकारण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायर्‍या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय अलिकडच्या काळात करण्यात आली आहे. यात्रे व्यतिरिक्त दर रविवारी येथे भाविक देर्शनास येतात.
हळदीचा भंडारा व भरीत भाकरीचा नैवेद्य खंडोबास हळदीचा भंडारा व खोबरे उधळून पुजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात विधीवत पूजा करतांना पाटावर तबकात गहू त्यावर तांब्याचा कलश पाच पाने त्यापैकी तीन पानावर तांब्याच्या अथवा चांदीच्या खंडोबाच्या घोड्यावरच्या अवताराच्या प्रतिमा ठेवून बेल भंडार उधळून सदानंदाचा येळकोटाचा गजर करून बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याच्या भरताचा नैवेद्य देण्याची प्रथा असून खंडोबाच्या गजरात तळी उचलली जाते.

काकणबर्डीला यात्रेचे स्वरूप
काकणबर्डीवर खंडोबाच्या दर्शनास तालुक्यासह जिल्हाभरातून सर्वच स्तरातील व समाजाचे लहान मोठे, बाल गोपाळ, स्त्री पुरुष हजेरी लावतात. टेकडी सह परिसरात खेळणी, पाळणे, हलवाईच्या हाँटेल्स, रसवंती, दुकाने थाटली जातात. तसेच भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय व व्यवस्था शहरातील सामाजिक मंडळाकडून केली जाते. यात्रेत शेव- मुरमरे, गुळाची जिलेबी व रेवड्या या खाद्य पदार्थांसह खंडोबावर उधळण्यासाठी हळद व खोबरा, झेंडूच्या फुलांच्या माळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यात्रेच्या दिवशी सर्वत्र उत्साह असतो भाविक सदानंदाचा येळकोट व जय मल्हारच्या गजरात काकणबर्डी चढून खंडोबाचे दर्शन घेतात या ठिकाणी मातृभूमी मिल्ट्री व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालविणारे निवृत्त सैनिक रवींद्र झुंबरसिंग शिंदे यांनी टेकडी परिसरात शहरातील दानशूर व्यक्तींच्या योगडणातून व स्वखर्चा तून वृक्ष लागवड व झाडांचे संवर्धन व पर्यावरण वाढीचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीला टेकडी हिरव्यागार झाडांनी विलोभनीय दिसते. तर सालाबादा नुसार आर्टिस्ट लक्ष्मण सुर्यवंशी हे मंदिरातील मुर्त्या रंगवितात.

Protected Content