क्वारांटाइन होण्यास नकार ; अमळनेरात १८ जणांविरुद्ध गुन्हा


अमळनेर (प्रतिनिधी)
कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या १८ जणांनी क्वारांटाइन होण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील वाडी चौकाजवळ असलेल्या गुरव गल्लीमधील एक कुटुंब कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या परिसरातील १८ जणांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून प्रताप महाविद्यालय परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी गेले होते. परंतू तीन वेगवेगळ्या कुटुंबातील एकूण १८ जणांनी क्वारंटाइन होण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सक्त कारवाई करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमळनेर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २८५ वर पोहचली आहे.

Protected Content