क्वारंटाइन सेंटरमध्ये अंमली पदार्थ आढळल्यास बडतर्फची कारवाई करणार ! – महापौर भारती सोनवणे

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मनपाच्या क्वारंटाइन सेंटरमधील व्यक्ती त्याठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची तक्रार महापौरांकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची दखल घेऊन महापौर भारती सोनवणे यांनी सोमवारी त्याठिकाणी पाहणी केली. कर्मचाऱ्यांना जाब विचारत असा काही प्रकार आढळून आला आयुक्तांकडे तक्रार करून बडतर्फची कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौरांनी दिला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तयार करण्यात आलेल्या मनपा कोरोना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल असलेले काही व्यक्ती त्याठिकाणी मद्यपान आणि अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची तक्रार महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाली होती. स्थानिक माध्यमातून देखील याबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. महापौरांनी त्याची तात्काळ दखल घेत आयुक्तांना पत्र पाठविले होते. सोमवारी दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी क्वारंटाइन सेंटरची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, डॉ.राम रावलानी आदी उपस्थित होते.

इमारतीची सुरक्षा असलेले प्रमुख तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून महापौरांनी त्यांना संबंधित प्रकाराबाबत विचारणा केली. प्रत्येकाकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे, बाहेरून कुणीही काहीही आत घेऊन जाणार नाही याची दक्षता घ्यावी. क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींना इमारतीबाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.

Protected Content